Friday 2 March 2018

गाळणा

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: गाळणा टेकड्या
उंची किल्ल्याची उंची : साधारण २००० मीटर
जिल्हा : नाशिक
श्रेणी : सोपी 
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पासून ३२ किलोमीटर अंतरावर गाळणा गावात गाळणा किल्ला आहे. नाशिक व धुळे यांच्या सीमारेषेवर असलेला हा किल्ला धुळेपासून अधिक जवळ आहे. ८ दरवाजे, अनेक बुरुज, तटबंदी, पाण्याची टाकी आणि अनेक वास्तूंनी हा किल्ला सजलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला नाथपंथियांचा आश्रम यामुळे गाळणा गावाला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे याठिकाणी भरपूर वर्दळ असते.
इतिहास :
गाळणा किल्ल्यावरील गुहा आणि टाक्यांची रचना पाहाता हा किल्ला प्राचीन काळा पासून अस्तित्वात असावा परंतु याचा लिखित इतिहास १३ व्या शतकापासून सापडतो. १३ व्या शतकात गाळणा किल्ल्यावर राठोड वंशीय बागुल यांचे राज्य होते. याच बागुल राहांमुळे या भागाला बागलाण असे नाव मिळाले होते. सोळव्या शतकात (इसवीसन १५१० ते १५२६) गाळाणा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता. इसवीसन १५२६ मध्ये बागलाणचा राजा बहिरजी याने निजामाकडून हा किल्ला जिंकून घेतला. इसवीसन १५५५ मध्ये निजामशहाने गाळणा पुन्हा जिंकून घेतला. पुढे मोगलांनी निजामशाही गिळंकृत केल्यावर गाळणा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. इसवीसन १७५२ मध्ये भालकीचा तह झाला त्यावेळी हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर हा किल्ला होळकरांच्या ताब्यात होता. इसवीसन १८१८ मध्ये इंग्रजांनी गाळणा किल्ला जिंकून घेतला.
पोहोचण्याच्या वाटा :
गाळणा किल्ल्यावर जाण्यासाठी मालेगाव आणि धुळे या दोंन्ही बाजूंनी रस्ते आहेत. आपल्याला मालेगाव - डोंगराळे मार्गे गाळणा गावात पोहचता येते. मालेगावाहून डोंगराळे पर्यंत येण्यास एसटी बसेस आहेत. मालेगाव - डोंगराळे अंतर साधारणत: ३० किमी आहे. धुळ्याहूनही डोंगराळ्याला बसेस आहेत. हे अंतर साधारणपणे ३५ कि.मी आहे. डोंगराळेहून २ किमी अंतरावर असलेल्या गाळणा गावात पोहचता येते. गाळणा हेच किल्ल्याच्या पायथ्याच्या गाव. गाळणा गावात नाथपंथियांचा एक मठ आहे. या मठाच्याच बाजूने किल्ल्यावर जाण्याची वाट आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमात राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय गाळणा गावात होऊ शकते. किल्ल्यावर राहायचे असल्यास जेवणाची सोय स्वत: करावी.
पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गाळणा गावातून १० मिनिटे लागतात.
जवळची ठिकाणे : मालेगांव ३० किमी. धुळे ३५ किमी.
टीप : एका दिवसात गाळणा व जवळच असलेला कंक्राळा किल्ला पाहता येतो.


































राजगड - स्वराज्याची प्रथम राजधानी

जिल्हा : पुणे
तालुका : वेल्हे
श्रेणी : मध्यम
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग
अनेकवेळा भेटूनही आपले समाधान होणार नाही असा गड. प्रत्येक भेटीत नव्याने सापडणारा असा राजगड म्हणजे वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना.
राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदु स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ किमी अंतरावर अन्‌ भोरच्या वायव्येला २४ किमी अंतरावर नीरा वेळवंडीका नदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती, म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.
शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो.
येथील तीन माच्या पद्मावती, सुवेळा व संजीवनी आणि बालेकिल्ला यांचे भॊगोलिक स्थान व शिवरायांनी त्यांची केलेली बांधणी आपल्याला अचंबित करते.
राजगड म्हणजे असंख्य द्वारांचे माहेरघर. प्रत्येक माचीकडून गडात प्रवेश करण्यासाठी दरवाजे आहेत.
येथील सुवेळा माचीवरून होणारा सूर्योदय व संजीवनी माचीवरून होणारा सूर्यास्त पाहणे म्हणजे अलौकिक सौंदर्याचा नजराणा.
पहाण्याची ठिकाणे :
पद्मावती तलाव :
गुप्त दरवाजाकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे.
रामेश्वराचे मंदिर:
पद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वाभिमुख असे रामेश्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारूतीरायांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
राजवाडा:
रामेश्वर मंदिरापासून पायर्‍यांनी वर जातांना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. याशिवाय राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारुकोठार आहे.
सदर:
ही गडावरची सर्वात महत्वाची अशी वास्तू आहे. रामेश्वर मंदिरापासून पायर्‍यांनी वर गेल्यावर उजव्या हातास राजवाड्याचे अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे सदर आहे. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे. अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे.
पाली दरवाजा:
पाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायर्‍या खोदल्या आहेत.पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्ती सुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना ’फलिका’ असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहोचतो.
गुंजवणे दरवाजा:
गुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाजाला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरुज आहेत. गुंजवणे दरवाजाच्या दुसर्‍या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे. या दरवाजाच्या शेवटी व गणेश पट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिके समोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरुन श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते. या सर्व गोष्टींवरुन असे अनुमान निघते की, हे प्रवेशद्वार शिवपूर्वकालात बांधलेले असावे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत.
पद्मावती माची:
राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. यापैंकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईंची समाधी ,हवालदारांचा वाडा, रत्नशाला, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत. याशिवाय पद्मावती माचीवर ब्राम्हणवर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत.
पद्मावती मंदिर :
सध्या २००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. शिवरायांनी किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला तीन मूर्त्या दिसतात. मुख्य पुजेचे मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केलेली आहे. त्याच्या उजव्या बाजुला लहान असलेली मूर्ती शिवरायांनी स्थापित केलेली आहे, तर दोन मूर्तीच्या मध्ये शेंदूर फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मुर्ती आहे.या मंदिरात सध्या २० ते ३० जणांना राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबांईची समाधी आहे.
संजीवनी माची:
सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच किमी आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरुन उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरुंज लागतात. या तिन्ही बुरुजावर शिवकालात प्रचंड मोठ्या तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरुज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे या भुयारातून बाहेरील तटबंदी कडे येण्यासाठी दिंड्यांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळु दरवाजाने सुद्धा जाता येते. आळु दरवाजा पासून राजगडाची वैशिष्टय असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा ते पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायर्‍यांच्या दिंड्या आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदी मध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे (शौचकुप) आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेत. यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.
आळु दरवाजा:
संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणा वरुन राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाजातून जात असे. आळु दरवाजा सद्यस्थितीला ढासाळलेल्या अवस्थतेत आहे. या दरवाजावर एक शिल्प आहे. वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे,असे चित्र या शिल्पात दाखवले आहे.
सुवेळा माची:
मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव "सुवेळा" असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनी एवढी लांब नाही. मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे.
माचीच्या प्रारंभी टेकडी सारखा भाग आहे याला "डुबा" असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणार्‍या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटे दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. येथे असणारे चौथरे म्हणजे एके काळी येसाजी कंक, तानाजी मालसुरे व शिलींबकर या सरदारांची घरे होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुसर्‍या टप्प्यावर जाते, तर डावीकडे जाणारी वाट काळेश्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते. आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरु होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुसर्‍या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केलेली आहे. दुसर्‍या टप्पयाकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते. या खडकालाच नेट किंवा ’हत्तीप्रस्तर’ असे म्हणतात. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला "मढे दरवाजा" असे म्हणतात. हत्ती प्रस्तराच्या पुढील भागात सुद्धा एक असाच गुप्त दरवाजा आहे. सुवेळा माचीच्या तटबंदीला एकुण १७ बुरुज आहेत. त्यापैकी ७ बुरुजांना चिलखती बुरुजांची सोय आहे.
सुवेळा माचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे.
काळेश्वरी बुरुज आणि परिसर:
सुवेळा माचीच्या दुसर्‍या टप्प्याकडे जाणार्‍या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे रामेश्वर मंदिराचे काही अवशेष आहेत. या रामेश्वर मंदिरात शिवलिंग, भग्न नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात.या रामेश्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्वरी बुरुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो.
बालेकिल्ला:
राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवलेले आहेत.
दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तरबुरुच आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते. आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला "उत्तर बुरुज" असे म्हणतात. येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो. या उत्तर बुरुजाच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्न अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात.
राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात. गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.
राहाण्याची सोय :
१) गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते.
२) पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय : पद्मावती मंदिराच्या समोरच बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : पायथ्या पासून ३ तास लागतात.
१. गुंजवणे गाव - गुंजवणे दरवाजा असा मार्ग आहे. परंतु माहितगार सोबत असल्याशिवाय या मार्गाने जाऊ नये.
२. गुंजवणे - चोर दरवाजा असा मार्ग आहे.
३. पाली गाव - पाली दरवाजा असा सोपा मार्ग आहे.
जाण्यासाठी मार्ग : पुणे ते राजगड (नसरापूरमार्गे ) : ६० किमी पाबे घाटमार्गे ५० किमी
भोर ते राजगड : ४५ किमी
जवळची ठिकाणे : तोरणा किल्ला १९ किमी
भोर : ४५ किमी
सिंहगड : ४० किमी
रोहिडा : ५८ किमी
बनेश्वर : ३५ किमी
भुतोंडे : १० किमी (येसाजी कंकांचा वाडा)
राजगड - तोरणा - लिंगाणा - रायगड असा पायी ट्रेक करता येतो.


































गाळणा

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: गाळणा टेकड्या उंची किल्ल्याची उंची : साधारण २००० मीटर जिल्हा : नाशिक श्रेणी : सोपी  नाशिक जिल्ह्य...